जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द
– पालकमंत्री चंद्रकांत पाटील
– मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात दिली ग्वाही
– समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन वाटचाल
– महिलांच्या सक्षमीकरणास शासनाचे प्राधान्य
– सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवेसाठी प्रयत्नशील
- सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : शेतकरी आणि सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून अनेक कल्याणकारी योजना राज्य शासन राबवित आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेवून राज्य शासन वाटचाल करीत आहे. सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द असल्याची ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली.
भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनी पोलीस संचलन मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तद्नंतर सर्व जिल्हावासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देवून संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपवनसंरक्षक नीता कट्टे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर, यांच्यासह आजी माजी लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रत्येक कार्यालयात संविधान प्रतसाठी आग्रही
- पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, दि. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान स्वीकारले गेले व 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आणले गेले. भारतीय संविधान मार्गदर्शनीय आणि वंदनीय आहे. सर्व शैक्षणिक संस्था व शासकीय, निमशासकीय कार्यालयात सन्मानपूर्वक संविधान प्रत ठेवावी, असे त्यांनी सूचित केले.