Uncategorized

जिल्हा परिषद कर्मचारी-शिक्षकांना सुधारित विमा संरक्षण द्या

राष्ट्रीयकृत बँकांशी सामंजस्य करार करण्याची जुनी पेन्शन संघटनेची मागणी; उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांना निवेदन

सांगली : प्रतिनिधीसांगली जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेसाठी प्रमुख राष्ट्रीयकृत बँकांशी सामंजस्य करार (एमओयू) करून सुधारित नैसर्गिक मृत्यू व अपघाती विमा संरक्षण योजना तातडीने लागू करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या सांगली जिल्हा शाखेने केली आहे.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सांगली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती ऋषिकेशदादा लाड यांची भेट घेऊन या मागणीचे सविस्तर निवेदन सादर केले.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे गटनेते आशिष जाधव उपस्थित होते.निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा परिषदेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन राष्ट्रीयकृत बँकांमार्फत अदा केले जाते. रत्नागिरी व सोलापूर जिल्हा परिषदेच्या धर्तीवर सांगली जिल्हा परिषदेनेही प्रमुख राष्ट्रीयकृत बँकांशी विशेष सामंजस्य करार केल्यास कर्मचाऱ्यांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक बोजा न पडता भरीव विमा संरक्षण उपलब्ध होऊ शकते.या योजनेअंतर्गत नैसर्गिक मृत्यू झाल्यास १० लाख रुपयांपर्यंत टर्म इन्शुरन्स संरक्षण, अपघाती मृत्यू झाल्यास १ कोटी रुपयांपर्यंत अपघात विमा संरक्षण मिळू शकते. विमान अपघातात मृत्यू झाल्यास १ कोटी ६० लाख रुपयांपर्यंत विशेष संरक्षण, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास १ कोटी रुपयांपर्यंत, तर अंशतः अपंगत्वासाठी ८० लाख रुपयांपर्यंत आर्थिक संरक्षण उपलब्ध होऊ शकते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, संबंधित कर्मचाऱ्याचा अन्य वैयक्तिक विमा असला तरी बँकेच्या सॅलरी पॅकेजअंतर्गत मिळणारा हा विमा लाभ स्वतंत्रपणे देय राहू शकतो. त्यामुळे अनपेक्षित संकटसमयी हजारो शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.दरम्यान, सदर निवेदनाचा सविस्तर अभ्यास करून संबंधित बँकांशी चर्चा करण्यात येईल.

शिक्षक व कर्मचाऱ्यांना अधिकाधिक विमा संरक्षण मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग व प्रशासनाकडून आवश्यक ती पावले उचलली जातील, असे आश्वासन उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांनी शिष्टमंडळाला दिले.जिल्हा परिषद प्रशासनाने राष्ट्रीयकृत बँकांशी तातडीने समन्वय साधून सुधारित विमा संरक्षणासाठी सामंजस्य करार करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

या निवेदनावर जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे, जिल्हा सचिव स्वप्निल मंडले, जिल्हा कार्याध्यक्ष विरेश हिरेमठ, जिल्हा कार्यवाहक नेताजी भोसले, जिल्हा कोषाध्यक्ष राजकुमार भोसले यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी शिक्षक संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष अविनाश गुरव व उर्दू शिक्षण संघटनेचे राज्याध्यक्ष मुस्ताक पटेल उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close