हिंगणी बुद्रुक ज्ञानदीप गुरुकुलमध्ये १०८ वृक्षांचे रोपण*
वृक्षमित्र पोलीस परशुराम लांबतुरे यांच्या पुढाकार

वृक्षमित्र पोलीस परशुराम लांबतुरे यांच्या पुढाकारातू
*ज्ञानदीप गुरुकुलमध्ये १०८ वृक्षांचे रोपण
‘झाडे लावा, झाडे जगवा’चा कृतीतून संदेश; तीन टप्प्यांत गुरुकुल परिसरात ३१० वृक्षांची लागवड

किल्ले धारूर : पर्यावरण संवर्धनाचा संदेश केवळ शब्दांत न देता प्रत्यक्ष कृतीतून समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य वृक्षमित्र पोलीस परशुराम लांबतुरे सातत्याने करीत आहेत. त्यांच्या पुढाकारातून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ ग्रुप, सोलापूर यांच्या वतीने ज्ञानदीप गुरुकुल, हिंगणी बु. (ता. धारूर, जि. बीड) येथे रविवारी, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी १०८ नारळ व चिंचेच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमामुळे गुरुकुल परिसरातील वृक्षारोपणाचा तिसरा टप्पा पूर्ण झाला असून, तीन टप्प्यांत येथे आतापर्यंत एकूण ३१० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
ह.भ.प. विठ्ठल महाराज मंत्री यांनी २०२१ मध्ये ज्ञानदीप गुरुकुलची स्थापना केली आहे. सुमारे दोन एकर परिसरात कार्यरत असलेल्या या गुरुकुलमध्ये जवळपास ४० मुले-मुली शालेय शिक्षणासोबतच आध्यात्मिक शिक्षण घेत आहेत. संस्कार, अध्यात्म आणि शिक्षणाची सांगड घालत गुरुकुलच्या माध्यमातून कार्य सुरू आहे. विठ्ठल महाराज मंत्री यांनी अनेक कीर्तनकार, कथाकार, मृदंगाचार्य तसेच गायनाचार्य घडविण्याचे कार्य केले आहे.
ज्ञानदीप गुरुकुलसमोर सध्या भव्य राम मंदिराचे बांधकाम सुरू आहे. या परिसराला हिरवाईने नटविण्यासाठी वृक्षमित्र परशुराम लांबतुरे यांच्या पुढाकारातून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ ग्रुपने यापूर्वीही वृक्षारोपण केले आहे. राम मंदिराच्या कार्यारंभाच्या निमित्ताने २०२२ मध्ये पहिल्या टप्प्यात ५१ झाडांची लागवड करण्यात आली होती. त्यानंतर २०२४ मध्ये दुसऱ्या टप्प्यात १५१ झाडांचे रोपण करण्यात आले. आता तिसऱ्या टप्प्यात १०८ झाडे लावण्यात आल्याने या परिसरात एकूण ३१० वृक्षांची हिरवाई फुलविण्याचा संकल्प प्रत्यक्षात उतरू लागला आहे.
वृक्षमित्र पोलीस परशुराम लांबतुरे यांच्या पर्यावरणप्रेमातून सुरू असलेल्या या चळवळीचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ झाडे लावण्यावर भर न देता त्यांचे संगोपन करण्यासाठीही विशेष प्रयत्न केले जातात. प्रत्येक वृक्षारोपणाच्या ठिकाणी स्वतंत्र व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून रोपांना वेळेवर पाणी मिळते का, त्यांची वाढ कशी होत आहे आणि आवश्यक संरक्षण केले जाते का, याचा सातत्याने पाठपुरावा करण्यात येतो. त्यामुळे ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून साकारला जात आहे.
सोलापूर, कर्नाटक आणि बीड जिल्ह्यांमध्ये या ग्रुपने मागील दहा वर्षांत १५ हजारांहून अधिक झाडांची लागवड केली आहे. वृक्षारोपणाबरोबरच नित्य श्रमदान आणि वृक्षदानाचा उपक्रमही सातत्याने राबविला जात आहे. या पर्यावरण चळवळीत लोकसहभागाला विशेष महत्त्व देण्यात येत असून, सर्वसामान्य नागरिकांमध्ये वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करण्याचे काम सुरू आहे.
या वृक्षारोपण उपक्रमात शिवानंद कोरे सर, परशुराम लांबतुरे, तुकाराम म्हेत्रे, वैभव म्हेत्रे, ज्ञानेश्वर वाघमारे, बसवराज भोंडगे, इराप्पा जिपटे, महादेव गंगोड, विठ्ठल कोनदे, श्रीमंत सुरवसे, गुरप्पा बोधले, यश कांबळे, सुनील मंदे, रोहिदास मंत्री, चैतन्य मंत्री, वेदांत मंत्री, भक्ती दिदी मंत्री, सिद्धाराम कोरे, युवराज एसलोटे व अशोक दळवी आदी सहभागी झाले होते. ज्ञानदीप गुरुकुलमधील विद्यार्थी तसेच हिंगणी येथील ज्येष्ठ नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे श्रमदान करून उपक्रमात सहभाग नोंदविला.
‘झाडे लावा, झाडे जगवा’ ग्रुपचा हा २ हजार २३७ वा श्रमदानाचा दिवस ठरला. गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने सुरू असलेल्या या पर्यावरणपूरक कार्याचे ज्ञानदीप गुरुकुल तसेच हिंगणी ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सांगतेप्रसंगी उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. यानंतर ह.भ.प. विठ्ठल महाराज मंत्री यांनी वृक्षमित्र पोलीस परशुराम लांबतुरे, ‘झाडे लावा, झाडे जगवा’ ग्रुपचे सदस्य तसेच श्रमदानात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
*चौकट*
■ *१५ हजारांहून अधिक वृक्षांची लागवड*
वृक्षमित्र पोलीस परशुराम लांबतुरे यांच्या पुढाकारातून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ ग्रुपने सोलापूर, कर्नाटक आणि बीड जिल्ह्यांत मागील दहा वर्षांत १५ हजारांहून अधिक झाडांची लागवड केली आहे. विशेष म्हणजे, वृक्षारोपणानंतर रोपांचे संगोपन व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जातो. नित्य श्रमदान आणि वृक्षदानाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाची ही चळवळ अविरतपणे सुरू आहे.
*चौकट*
■ *२,२३७ वा दिवस ठरला विशेष*
ज्ञानदीप गुरुकुल येथे झालेल्या वृक्षारोपणाचा दिवस हा ‘झाडे लावा, झाडे जगवा’ ग्रुपच्या सातत्यपूर्ण पर्यावरण कार्यातील २,२३७ वा श्रमदानाचा दिवस ठरला. वृक्षलागवड, श्रमदान आणि वृक्षसंगोपनाचा संकल्प घेऊन ग्रुपचे सदस्य गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत आहेत. त्यामुळे हा उपक्रम केवळ वृक्षारोपणापुरता मर्यादित न राहता एक व्यापक लोकचळवळ बनत असल्याचे चित्र आहे.



