जत पंचायत समितीमार्फत ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ सुरू करा : भारत क्षिरसागर
शिक्षक दिनी तालुक्यातील गुणवंत व उपक्रमशील शिक्षकांच्या कार्याचा सन्मान करण्याची मागणी

*जत पंचायत समितीमार्फत ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ सुरू करा : भारत क्षिरसाग
शिक्षक दिनी तालुक्यातील गुणवंत व उपक्रमशील शिक्षकांच्या कार्याचा सन्मान करण्याची मागण

जत / प्रतिनिधी
जत तालुक्यातील प्राथमिक शिक्षक शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवीत आहेत. अशा गुणवंत, कर्तृत्ववान व उपक्रमशील शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन जत पंचायत समितीच्या माध्यमातून ‘जत तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार’ सुरू करून त्यांचा सन्मान करण्यात यावा, अशी मागणी जत तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष भारत क्षिरसागर यांनी केली आहे.
प्राथमिक शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीचा महत्त्वाचा पाया मानला जातो. विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक शिक्षक प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे, शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवून देणे, विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणे, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देणे, डिजिटल शिक्षणाचा प्रभावी वापर करणे तसेच लोकसहभागातून शाळांचा भौतिक व शैक्षणिक विकास साधणे, अशा विविध माध्यमांतून शिक्षक मोलाचे योगदान देत आहेत.
अशा शिक्षकांच्या उल्लेखनीय कार्याला योग्य प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या कार्यातून इतर शिक्षकांनाही प्रेरणा मिळावी, यासाठी दरवर्षी ५ सप्टेंबर या शिक्षक दिनाचे औचित्य साधून जत पंचायत समितीच्या वतीने ‘जत तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात यावा, अशी मागणी क्षिरसागर यांनी केली आहे.
या पुरस्कारासाठी तालुक्यातील शिक्षकांची पारदर्शक व निकषाधारित पद्धतीने निवड करण्यात यावी. निवड करताना संबंधित शिक्षकांचे शैक्षणिक कार्य, नाविन्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेले प्रयत्न, विविध परीक्षांतील विद्यार्थ्यांचे यश, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान तसेच सामाजिक सहभाग आदी बाबींचा विचार करण्यात यावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
अशा पुरस्कारामुळे शिक्षकांच्या कार्याची योग्य दखल घेतली जाईल. त्याचबरोबर शिक्षकांमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण होऊन अधिक दर्जेदार व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास प्रोत्साहन मिळेल. परिणामी तालुक्यातील प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तावाढीलाही चालना मिळेल, असा विश्वास क्षिरसागर यांनी व्यक्त केला.
“शिक्षकांचा सन्मान हा केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचा सन्मान आहे. जत तालुक्यात अनेक शिक्षक अत्यंत निष्ठेने आणि कल्पकतेने काम करीत आहेत. पंचायत समितीच्या माध्यमातून अशा कर्तृत्ववान शिक्षकांचा गौरव केल्यास त्यांना अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल. त्यामुळे यंदापासूनच ‘जत तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार’ सुरू करण्यात यावा,” असे भारत क्षिरसागर यांनी सांगितले.
जत पंचायत समितीने या मागणीचा सकारात्मक विचार करून शिक्षक दिनापासूनच या पुरस्काराची सुरुवात करावी, अशी अपेक्षा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.



