Uncategorized

शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकरी दिन साजरा!

खंडनाळ येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची जयंती साजरी; जत कृषी विभागाचा उपक्रम

जत /प्रतिनिधी 

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकरी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जत कृषी विभागाच्या वतीने खंडनाळ येथील गंगनमले वस्ती येथे हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांना तूर पिकाबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी माडग्याळ मंडळ कृषी अधिकारी रोहन गडदे यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी गडदे यांनी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतकरी, कृषी व सहकार क्षेत्रासाठी केलेल्या प्रेरणादायी कार्याची माहिती दिली. महाराष्ट्रातील साखर उद्योगाला चालना देण्यात त्यांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेवरही त्यांनी प्रकाश टाकला.

यानंतर उपस्थित शेतकऱ्यांना तूर पिकाचे व्यवस्थापन, उत्पादनवाढीसाठी आवश्यक उपाययोजना आणि पिकाच्या योग्य निगेबाबत प्रशिक्षण देण्यात आले. माडग्याळ-२चे उपकृषी अधिकारी जी. एस. हलकुडे यांनी खरीप बाजरी व तूर प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध निविष्ठांचा योग्य वापर कसा करावा, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

पांडोझरीच्या सहायक कृषी अधिकारी सौ. विजया राठोड तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिलेले मार्गदर्शन शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरले.

या कार्यक्रमास श्री गणेश स्वयं सहाय्यता शेतकरी गटातील सर्व शेतकरी, परिसरातील इतर शेतकरी तसेच वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारार्थी बसवराज कुंभार उपस्थित होते. शेतकरी दिनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या बांधावर आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थित शेतकऱ्यांनी स्वागत केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close