भिवर्गी फाट्यावर मेंढी व्यापाऱ्यांवर सशस्त्र दरोडा
स्कार्पिओ आडवी लावून ट्रक अडविला; बंदुकीचा धाक दाखवत रोकड, सोन्याची साखळी व मोबाईल असा लाखोंचा ऐवज लंपास

- भिवर्गी फाट्यावर मेंढी व्यापाऱ्यांवर सशस्त्र दरोडा
- स्कार्पिओ आडवी लावून ट्रक अडविला; बंदुकीचा धाक दाखवत रोकड, सोन्याची साखळी व मोबाईल असा लाखोंचा ऐवज लंपास

उमदी :प्रतिनिधी
तामिळनाडूमधील सेलम येथून माडग्याळच्या मेंढी बाजाराकडे निघालेल्या व्यापाऱ्यांचा ट्रक अडवून अज्ञात दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत सुमारे २० लाखांची रोकड, सोन्याची साखळी व दोन मोबाईल असा लाखोंचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना उमदीजवळील भिवर्गी फाट्यावर घडली. या घटनेने जत तालुक्यात खळबळ उडाली असून, दरोडेखोरांच्या शोधासाठी उमदी पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची पथके सक्रिय झाली आहेत.
तामिळनाडूतील सेलम येथील काही व्यापारी मेंढ्या खरेदी करण्यासाठी ट्रक क्रमांक KS-51-AS-7279 मधून माडग्याळच्या बाजाराकडे निघाले होते. उमदीजवळ संख-विजापूर मार्गावरील भिवर्गी फाट्याच्या परिसरात त्यांचा ट्रक पहाटेच्या सुमारास आला असता, अचानक एका स्कार्पिओ कारने ट्रकसमोर आडवे येत रस्ता अडविला. त्यामुळे चालकाला नाइलाजाने ट्रक थांबवावा लागला.
ट्रक थांबताच स्कार्पिओमधून तब्बल सात ते आठ जण खाली उतरले. त्यांनी ट्रकमधील व्यापाऱ्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्यानंतर जवळ असलेला ऐवज तातडीने देण्याची मागणी करत, ऐवज न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे व्यापाऱ्यांनी पोलिसांना सांगितले.
दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखविल्याने व्यापारी भयभीत झाले. या संधीचा फायदा घेत दरोडेखोरांनी व्यापाऱ्यांकडील सुमारे २० लाख रुपयांची रोकड जबरदस्तीने आपल्या ताब्यात घेतली. त्याचबरोबर सुमारे दोन तोळे वजनाची सोन्याची साखळी आणि दोन मोबाईल फोन असा ऐवजही लुटला. रोकड व इतर ऐवज मिळून जवळपास ३० लाख रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लंपास केल्याची माहिती समोर आली आहे.
दरोडा टाकल्यानंतर संशयितांनी स्कार्पिओ कारमधून घटनास्थळावरून पोबारा केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर व्यापाऱ्यांनी तातडीने उमदी पोलीस ठाणे गाठून पोलिसांना संपूर्ण घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच उमदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. घटनास्थळावरील परिस्थितीचा पंचनामा करून दरोडेखोरांचा माग काढण्याच्या दृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे. याप्रकरणी अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्या शोधासाठी उमदी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
दरोडेखोरांनी वापरलेल्या स्कार्पिओ कारचा माग काढण्याबरोबरच परिसरातील संभाव्य मार्ग, उपलब्ध माहिती आणि संशयित व्यक्तींच्या हालचालींच्या आधारे तपास केला जात आहे. या प्रकरणातील काही संशयितांच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक कर्नाटकातील विजापूर परिसराकडे रवाना झाल्याची माहिती आहे.
माडग्याळच्या प्रसिद्ध मेंढी बाजारासाठी परराज्यातून मोठ्या प्रमाणावर व्यापारी येत असतात. अशा व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात रोकड असण्याची शक्यता लक्षात घेऊन हा दरोडा नियोजनबद्ध पद्धतीने टाकण्यात आला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पोलिस तपासात दरोडेखोरांनी व्यापाऱ्यांच्या हालचालींवर आधीपासून लक्ष ठेवले होते का, याचाही तपास केला जात आहे.
या घटनेमुळे उमदी–संख–विजापूर मार्गावरील व्यापारी व वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरोडेखोरांना लवकरात लवकर जेरबंद करून व्यापाऱ्यांना सुरक्षिततेचा विश्वास देण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
विशेष चौकट १
स्कार्पिओ आडवी लावली अन् ट्रक थांबविला!
भिवर्गी फाट्यावर स्कार्पिओ कारने ट्रकचा मार्ग अडविला. कारमधून ७ ते ८ जण उतरले आणि व्यापाऱ्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की करत बंदुकीचा धाक दाखविला. ऐवज न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत दरोडेखोरांनी रोकड व अन्य मौल्यवान वस्तू लुटल्या.
विशेष चौकट
विजापूरकडे पोलिसांचे पथक रवाना
दरोड्याप्रकरणी अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमदी पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची पथके आरोपींच्या शोधात असून, काही संशयितांच्या तपासासाठी कर्नाटकातील विजापूर परिसराकडेही पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.



