Uncategorized

जाचक ‘झूम’ आदेशावर शिक्षकांचा एल्गार; पूर्ण बहिष्कार!*

स्वतःचा मोबाईल व इंटरनेट वापरून दिवसभर ऑनलाईन निगराणीला विरोध; जुनी पेन्शन संघटनेचे सर्व शिक्षकांना आवाहन

  1. *जाचक ‘झूम’ आदेशावर शिक्षकांचा एल्गार; पूर्ण बहिष्कार!
  • स्वतःचा मोबाईल व इंटरनेट वापरून दिवसभर ऑनलाईन निगराणीला विरोध; जुनी पेन्शन संघटनेचे सर्व शिक्षकांना आवाहन

  • सांगली : प्रतिनिधी

सांगली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना स्वतःचा वैयक्तिक मोबाईल व इंटरनेटचा वापर करून शालेय वेळेत संपूर्ण दिवसभर ‘झूम मिटिंग’ सुरू ठेवून अध्यापनावर ऑनलाईन निगराणी ठेवण्याच्या आदेशाला महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, जिल्हा सांगली यांनी तीव्र विरोध दर्शविला असून, या जाचक व अव्यवहार्य आदेशावर पूर्ण बहिष्कार टाकण्याचे आवाहन जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक, पदवीधर व प्राथमिक शिक्षकांना करण्यात आले आहे.

शिक्षकी पेशा हा संवेदनशील असून शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील प्रत्यक्ष व जिवंत संवाद हा अध्यापनाचा महत्त्वाचा भाग आहे. अशा परिस्थितीत शिक्षकांनी सतत कॅमेऱ्याच्या निगराणीखाली राहून अध्यापन करावे, हा प्रकार शिक्षकांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचविणारा असल्याची भूमिका संघटनेने मांडली आहे. सतत कॅमेरा सुरू ठेवून अध्यापन केल्याने शिक्षकांसह विद्यार्थ्यांवरही विनाकारण मानसिक ताण निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कॅमेऱ्याच्या चौकटीत शिक्षकांना बांधून ठेवण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शाळेत भेट देऊन अध्यापनाचे निरीक्षण करावे व आवश्यक मार्गदर्शन करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.

जिल्ह्यात अनेक वर्षांनंतर केंद्रप्रमुखांची पदे पूर्ण क्षमतेने भरली असून प्रत्येक केंद्रासाठी विषयतज्ज्ञ साधन व्यक्तीही उपलब्ध आहेत. पर्यवेक्षणासाठी सक्षम यंत्रणा उपलब्ध असताना शाळांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन अध्यापनाची गुणवत्ता तपासणे, त्रुटी निदर्शनास आणून देणे व शिक्षकांना मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे. असे असताना प्रत्यक्ष पर्यवेक्षणाऐवजी दिवसभर ऑनलाईन ‘झूम मिटिंग’च्या माध्यमातून शिक्षकांवर निगराणी ठेवण्याची आवश्यकता काय, असा सवालही संघटनेने उपस्थित केला आहे.

प्रशासनाकडून अशा ऑनलाईन निगराणीसाठी शिक्षकांना स्वतंत्र मोबाईल अथवा इंटरनेट सुविधा देण्यात आलेली नाही. स्वतःचा वैयक्तिक मोबाईल, बॅटरी व इंटरनेट डेटा वापरून शिक्षकांनी दिवसभर ‘झूम मिटिंग’ सुरू ठेवावी, ही अपेक्षा अन्यायकारक असल्याचे संघटनेने म्हटले आहे. खर्च शिक्षकांनी करायचा आणि त्याच माध्यमातून प्रशासनाने शिक्षकांवर सातत्याने निगराणी ठेवायची, हा प्रकार मान्य केला जाणार नसल्याचेही संघटनेने स्पष्ट केले आहे.

शाळांमध्ये मोबाईलच्या वापरावर नियंत्रण आणावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने यापूर्वीही वेळोवेळी केली आहे. आता प्रशासनाने ऑनलाईन निगराणीचा हा प्रकार सुरूच ठेवला, तर जिल्ह्यातील शिक्षकांनी एकत्रितपणे शालेय वेळेत मोबाईलचा वापर न करण्याचा निर्धार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शिक्षक दिनापासून शालेय वेळेत मोबाईल वर्गात न नेता तो कार्यालयात ठेवून मोबाईलच्या माध्यमातून होणाऱ्या अशा प्रशासकीय निगराणीवर बहिष्कार घालण्याची भूमिकाही संघटनेने घेतली आहे.

शिक्षक आपले अध्यापनाचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत असून यापुढेही ते पार पाडतील. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शाळेत यावे, वर्गात बसून अध्यापनाचे निरीक्षण करावे, त्रुटी असल्यास त्या निदर्शनास आणून द्याव्यात आणि योग्य मार्गदर्शन करावे, याचे शिक्षकांकडून सदैव स्वागतच केले जाईल. मात्र, मोबाईलच्या स्क्रीनमध्ये शिक्षकांना बंदिस्त करून त्यांच्यावर सतत ऑनलाईन निगराणी ठेवण्याचा प्रकार कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नाही, अशी ठाम भूमिका संघटनेने घेतली आहे.

दरम्यान, सांगली जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक, पदवीधर व प्राथमिक शिक्षकांनी प्रशासनाकडून पाठविण्यात येणाऱ्या अशा ऑनलाईन ‘झूम मिटिंग’च्या लिंकवर सहभागी होऊ नये आणि या अवाजवी, अव्यवहार्य व मानसिक ताण निर्माण करणाऱ्या आदेशावर एकमुखाने व ठामपणे शंभर टक्के बहिष्कार टाकावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, जिल्हा सांगली यांच्या वतीने करण्यात आले आहे. “शिक्षक सन्मानाशी तडजोड नाही. संघटित व्हा, एकत्र या आणि अन्यायाविरोधात आवाज उठवा,” असा निर्धारही संघटनेने व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close